हनुमान जन्मोत्सव

Written by on April 6, 2023


Hanumanहनुमान जन्मोत्सव

आज चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जन्मोत्सवाचा हा परमपवित्र दिवस. सप्तचिरंजीवातील एक चैतन्य शक्ती अंजनी मातेच्या उदरातून आजच प्रकट झाली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या लाल गोळ्याकडे त्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली. हनुमानाची ती प्रचंड शक्तीयुक्त झेप पाहून इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले. इंद्र देवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले, ते हनुमंताच्या हनवटीला लागले आणि ते बालक मूर्च्छित झाले. हनुमान हे पवनसुत असल्याने पवनदेवाने या घटनेनंतर सर्वसृष्टीतला वायू ओढून घेतला. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यानंतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्च्छनेतून बाहेर आणले. पवनदेव शांत होऊन पुन्हा सर्वत्र वायुसंचारायला लागला सर्व देवतांनी हनुमानाला अनेक आशीर्वाद देत अनेक शक्ती प्रदान केल्या. हनुमानाची आराधना केल्याने काय लाभ होतात याबद्दल पराशर संहितेत सांगितले आहे,
“बुद्धीर्बलम् यशोधैर्यम् निर्भयत्वमरोगता ।
अजाड्यम् वाक्पटूत्वम् हनुमत् स्मरणात् भवेत् ।।
याचा अर्थ हनुमानाची आराधना केल्याने बुद्धीबळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, आरोग्य आणि वाक्पटूता हे गुण प्रसादाच्या रूपाने उपासकाला लाभतात.

दास्यभक्तीचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे श्रीहनुमान, हे प्रभू रामचंद्रांचे सेवक. प्रभू रामचंद्रांच्या आदेशाला आज्ञा प्रमाण मानून समुद्र उल्लंघन करत लंके कडे कुच करणारे हनुमान हे दासभक्तीचं एक अति उत्तम उदाहरण आहे. हनुमानाची भक्ती पाहून प्रभू श्रीरामांनी हनुमानाला वर मागायला सांगितले तेव्हा हनुमानांनी असा वर मागितला की, जो कोणी प्रभू श्रीरामाचे स्मरण करत असेल त्याचं संरक्षण हनुमंत करील आणि त्या व्यक्तीचं अहित कोणीही करू शकणार नाही. तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांना तथास्तु म्हटलं. म्हणून आजही जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे स्मरण केले जाते, पूजन केले जाते तिथे हनुमानाचा वास आशीर्वाद रूपात असतोच. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात,
“शरण शरण जी हनुमंता
तुज आलो रामदूता
काय भक्तीच्या त्या वाटा
मज दावाव्या सुभटा ।
याचा अर्थ असा, अहो मारुती राया तुम्ही रामाचे सेवक आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अहो श्रेष्ठ वीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत त्या मला दाखवा. सुभटा म्हणजेच चांगल्या, योग्य असे म्हणून त्यांनी हनुमंतांचा गौरव केला आहे. हनुमानाचे शस्त्र गदा आहे. हनुमानाला मारुती, बजरंगबली, रामभक्त, अंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते. हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळते. हनुमानाला भगवान महादेवाचा अवतार देखील मानले जाते. कलियुगात संकटाचे हरण करणारा म्हणून एकमेव हनुमंत असल्याचे मानले जाते.


Continue reading

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background