श्री रामनवमी

Written by on March 30, 2023


ram

श्री रामनवमी

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हटल्या जाणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांनी भूतलावर जन्म घेतला. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता माता कौसल्येच्या उदरी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला.  पुत्रकामेष्टी यज्ञाद्वारे मिळालेल्या पायस दानाच्या द्वारे राजा दशरथाच्या तीनही राण्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यात प्रभू श्रीराम कौसल्येच्या उदरी जन्माला आले. 

आदर्श पुरुषार्थाचे युगानुयुगे प्रेरणा देणारे दैवत म्हणजे प्रभू श्रीराम. श्रीराम एक वचनी, एक वाणी, एक पत्नी, गुणवान पुत्र व राजधर्मचारी होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असून देखील या सर्व गोष्टींचा त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता. संस्कृती रक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्यांच्यातील गुण आपल्यात कसे अंगीकारता येतील यासाठी श्रीरामांची शिकवण जाणली पाहिजे. महर्षी वाल्मिकी म्हणतात सगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्री राम. 

राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्या क्षणी ते अत्यंत आनंदीही झाले नाहीत आणि पुढच्या काही क्षणात आयोध्या सोडून १४ वर्ष वनवासाची बातमी कानावर पडली तेव्हा देखील ते शोक मग्न झाले नाहीत. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वनवासाला निघताना ते किंचित देखील डगमगले नाहीत. रावण एवढा मोठा, बलाढ्य राजा महान शिवभक्त असून देखील प्रभू श्री रामचंद्रांना अखेरीस शरण आला तो केवळ रामांच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच. यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की, उत्तम गुणांसमोर रथी महारथी देखील अखेरीस शरण येतात. माता कैकयीमुळे वनवास लाभला तरीदेखील त्या मातेचा प्रभू रामचंद्रांनी कधीही तिरस्कार किंवा द्वेष केला नाही. इतर मातांप्रमाणेच कैकेयीदेखील त्यांना कायम वंदनीय होती. प्रभू श्रीरामचंद्रांची मातृ-पितृ भक्ती देखील आजच्या तरुणांकरता अनुकरणीय अशीच आहे. 

प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाकडे पाहून मिळते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या अवताराने संपूर्ण राष्ट्राला जगण्याचा पथच भगवंताने दाखवला आहे.


Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background