अष्टविनायक

Written by on March 21, 2023


वक्रतुण्ड

 

वक्रतुण्डावतारश्च  देहानां ब्रह्मधारकः ।
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥

भगवान श्रीगणेशाचा ‘वक्रतुण्डावतार’ ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. मुगल पुराणानुसार भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत, ज्यात आठ अवतार प्रमुख आहेत. प्रथम अवतार वक्रतुण्डाचा आहे. अशी कथा आहे. की, देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यापासून भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र ( ॐ नमः शिवाय) याची दीक्षा प्राप्त करून भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला अभय होण्याचे वरदान दिले.

वरदान प्राप्त करून जेव्हा मत्सरासुर घरी परतला तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला दैत्यांचा राजा केले. दैत्य मंत्र्यांनी शक्तिशाली मत्सरासुराला विश्वविजय करण्याचा सल्ला दिला. शक्ती आणि पदाच्या मदाने चूर झालेल्या मत्सरासुराने आपली विशाल सेना घेऊन पृथ्वीवरील राजेलोकांवर आक्रमण केले. कोणताही राजा या महान असुरासमोर टिकू शकला नाही. काहीजणांनी पराजय स्वीकारला आणि काहीजण आपले प्राण वाचवून पर्वतांच्या गुहेमध्ये जाऊन लपले. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर मत्सरासुराचे शासन कायम झाले. पृथ्वीला आपल्या अधीन करून त्या महान पराक्रमी दैत्याने क्रमाने पाताळ आणि स्वर्गांवरसुद्धा चढाई केली. शेषाने विनयपूर्वक त्याच्या अधीन राहून त्याला करभार देणे स्वीकार केले. वरुण, कुबेर, यम इत्यादी समस्त त्याच्याद्वारे पराजित होऊन पळून गेले. इंद्रसुद्धा त्याच्यापुढे टिकू शकला नाही. मत्सरासुर स्वर्गाचासुद्धा सम्राट बनला.

असुरांच्या भीतीने दुःखी झालेल्या देवता ब्रह्मदेव आणि विष्णूंना बरोबर घेऊन कैलासाला पोहोचल्या. त्यांनी भगवान शंकरांना दैत्यांच्या अत्याचाराचा संपूर्ण समाचार सांगितला, भगवान शंकरांनी मत्सरासुराच्या अशा दुष्कर्माची भयंकर निंदा केली. हा समाचार ऐकून मत्सरासुराने कैलासावरसुद्धा बढ़ाई केली. भगवान शंकरांबरोबर त्याचे भयंकर युद्ध झाले. परंतु त्रिपुरारी भगवान शिवसुद्धा त्याच्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. त्याने शंकरांनासुद्धा कठोर पाशात बांधले आणि कैलासाचा मालक होऊन तो तेथेच राहू लागला. चहूकडे दैत्यांचा अत्याचार होऊ लागला.

दुःखी देवतांजवळ मत्सरासुराच्या विनाशाचा कोणताही उपाय राहिला नाही. ते अत्यंत चिंतातुर आणि बलहीन झाले होते. त्याचवेळी तेथे भगवान दत्तात्रेय आले. त्यांनी देवतांना वक्रतुण्डाच्या एकाक्षरी मंत्राचा (गं) चा उपदेश केला. समस्त देवता भगवान वक्रतुण्डाच्या ध्यानाबरोबर त्या एकाक्षरी मंत्राचा जप करू लागले. त्यांच्या आराधनेने संतुष्ट होऊन फलदाते वक्रतुण्ड तत्काल प्रगट झाले. ते देवतांना म्हणाले-‘तुम्ही लोक निश्चिंत व्हा. मी मत्सरासुराच्या गवला चूर-चूर करून टाकीन.’

भगवान वक्रतुण्डांनी आपल्या असंख्य गणांसह मत्सरासुराच्या नगराला चहूकडून वेढा दिला. दोघामध्ये भयंकर युद्ध झाले. पाच दिवस एकसारखे युद्ध चालू राहिले. मत्सरासुराचे सुंदप्रिय आणि विषयप्रिय नावाचे दोन पुत्र होते. वक्रतुण्डाच्या दोन गणांनी त्यांना ठार केले. पुत्रवधाने व्याकूळ झालेला मत्सरासुर रणभूमीत उपस्थित झाला. त्याने त्यावेळी भगवान वक्रतुण्डांना उद्देशून अनेक अपशब्द उच्चारले. भगवान वक्रतुण्डांनी प्रभावपूर्ण स्वरात उत्तर दिले- ‘जर तुला स्वतःचे प्राण प्रिय असतील तर शस्त्र खाली ठेवून मला शरण ये नाही तर माझ्या हातून तू निश्चित मारला जाशील.’

वक्रतुण्ड यांच्या भयानक रूपाला पाहून मत्सरासुर अत्यंत व्याकूळ झाला. त्याची सर्वशक्ती क्षीण झाली. भीतीमुळे तो थरथर कापू लागला. तसेच विनयाने वक्रतुण्ड यांची स्तुती करू लागला. त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन दयासागर वक्रतुण्डांनी त्याला अभय प्रदान करून स्वतःच्या भक्तीचे वरदान दिले. तसेच जीवनकाल शांतिपूर्वक चालविण्यासाठी त्याला पाताळात जाण्याचा आदेश दिला. मत्सरासुरापासून निश्चिंत होऊन देवगण वक्रतुण्ड यांची स्तुती करू लागले. देवतांना स्वातंत्र्य मिळवून देऊन प्रभु वक्रतुण्डांनी देवतांनासुद्धा आपली भक्ती प्रदान केली.

एकदन्त

ekdant

एकदन्तावतारो वै देहिनां ब्रह्मधारकः ।
मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः ॥

भगवान गणेशाचा ‘एकदन्तावतार’ देही-ब्रह्माचा धारक आहे, तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन उंदीर सांगितले गेले आहे.

मदासुर नावाचा एक बलवान पराक्रमी दैत्य होता. तो महर्षी च्यवनाचा पुत्र होता. एकवेळ तो आपल्या पित्याची आज्ञा घेऊन दैत्यगुरू शुक्राचार्याजवळ गेला. त्याने शुक्राचार्यांना म्हटले की, आपण मला कृपापूर्वक आपला शिष्य म्हणून स्वीकारा. मी संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी होऊ इच्छितो. माझी इच्छा ज्यायोगे पूर्ण होईल,  यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा. शुक्राचार्यांनी संतुष्ट होऊन त्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. सर्वज्ञ आचार्यांनी त्याला विधीसह एकाक्षरी (ह्रीं) शक्तिमंत्र दिला.

मदासुर आपल्या गुरूच्या चरणांना वंदन करून तप करण्यासाठी अरण्यात गेला. त्याने भगवतीचे ध्यान करीत हजारो वर्षेपर्यंत कठोर तप केले. येथपर्यंत की, त्याच्या शरीरावर वाळवीचे वारुळ तयार झाले. त्याच्या चहू बाजूला वृक्ष निर्माण झाले आणि वेली पसरल्या. त्याच्या कठोर तपश्चर्येला पाहून भगवती प्रसन्न होऊन प्रगट झाली. भगवती मातेने त्याला निरोगी राहण्याचे तसेच संपूर्ण ब्रह्मांडाचे निष्कंटक राज्य प्राप्त होण्याचे वरदान दिले.

मदासुराने प्रथम संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापन केले. नंतर स्वर्गावर चढाई केली. इंद्रादी देवतांना जिंकून तो स्वर्गांचासुद्धा अधिपती झाला. त्याने प्रमदासुराच्या सालसा कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला तीन पुत्र झाले. त्याने शूळपाणी भगवान शिवालासुद्धा पराजित केले. सर्वत्र असुरांचे क्रूर शासन अमलात आले. पृथ्वीवर संपूर्ण धर्म-कर्म लुप्त झाले. देवता आणि मुनींच्या दुःखांना सीमा राहिली नाही. चहूकडे हाहाकार माजला.

चिंतातुर देवगण सनत्कुमारांजवळ गेले. तसेच त्यांनी सनत्कुमारांना त्या असुराच्या विनाशासंबंधी आणि धर्मस्थापनेसंबंधी उपाय विचारला. सनत्कुमार म्हणाले- ‘हे देवगण हो! तुम्ही सर्वजण श्रद्धा-भक्तिपूर्वक भगवान एकदंताची उपासना करा. ते संतुष्ट होऊन अवश्य तुम्हा लोकांचे मनोरथ पूर्ण करतील.’

महर्षीच्या उपदेशानुसार देवगण एकदन्ताची उपासना करू लागले. तपश्चर्येची शंभर वर्षे पूर्ण होताच मूषकवाहन भगवान एकदन्त प्रगट झाले आणि त्यांनी ‘वरं ब्रूहि’ म्हटले. त्यावेळी देवगण विनयपूर्वक म्हणाले – ‘प्रभो! मदासुराच्या शासनाने देवगण स्थानभ्रष्ट आणि मुनिगण कर्मभ्रष्ट झाले आहेत. आपण कृपा करून आम्हांला या दुःखातून मुक्त करावे व आपली भक्ती प्रदान करावी.’

इकडे देवर्षीनी मदासुराला कळविले की, भगवान एकदन्ताने देवगणांना वरदान दिले आहे. आता ते तुझा प्राण हरण करण्यासाठी तुझ्याबरोबर युद्ध करू इच्छितात. मदासुर अत्यंत क्रोधित होऊन आपल्या विशाल सेनेसह एकदन्ताबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला. भगवान एकदन्त वाटेतच प्रगट झाले. राक्षसांनी पाहिले की, भगवान एकदन्त समोरून येत आहेत. ते उंदरावर स्वार झालेले आहेत. त्यांची आकृती अत्यंत भयानक आहे. त्यांच्या हातात परशू, पाश इत्यादी आयुधे आहेत. ते असुरांना म्हणाले की, तुम्ही आपल्या मालकाला सांगा, जर त्याला जिवंत राहायचे असेल तर देवतांशी द्वेष सोडून दे, त्यांचे राज्य त्यांना परत कर. जर तो असे करणार नसेल, तर मी त्याचा निश्चितच वध करीन. महाक्रूर मदासुर युद्धासाठी तयार झाला. तो आपल्या धनुष्यावर बाण चढविणार, एवढ्यातच भगवान एकदन्ताच्या तीव्र परशूचा घाव त्याला लागला आणि तो बेहोश होऊन खाली जमिनीवर पडला.

सावध झाल्यानंतर मदासुराला कळले की, हे सर्वसमर्थ परमात्माच आहेत. हात जोडून तो त्यांची स्तुती करीत म्हणाला की, हे प्रभो! आपण मला क्षमा करा आणि आपली दृढ भक्ती मला प्रदान करा. एकदन्तांनी प्रसन्न होऊन म्हटले की, ज्या ठिकाणी माझी पूजा-आराधना होत असेल, तेथे तू जाऊ नकोस. आजपासून तू पाताळात निवास कर. देवसुद्धा एकदन्ताची स्तुती करून आपापल्या लोकाला निघून गेले.

महोदर

Mahodar

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रह्मप्रकाशकः ।
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ॥

भगवान गणेशाचा महोदर नावाने विख्यात अवतार ज्ञान-ब्रह्माचा प्रकाशक आहे. तो मोहासुराचा विनाशक तसेच त्याचे उंदीर वाहन सांगितले गेले आहे.

दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका शिष्याचे नाव मोहासुर होते. त्यांच्या आदेशानुसार मोहासुराने भगवान सूर्याची आराधना केली. त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवान सूर्य प्रसन्न झाले. त्यांनी मोहासुराला सर्वत्र विजयी होण्याचे वरदान दिले. वर मिळाल्याने संतुष्ट होऊन असुर आपल्या स्थानावर परतला. शुक्राचार्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर अभिषिक्त केले. त्यानंतर त्याने आपल्या महान पराक्रमाने त्रैलोक्यावर अधिकार मिळविला. देवगण आणि मुनिगण पर्वतावर आणि अरण्यात लपून बसले. चहू बाजूंनी निश्चिंत होऊन मोहासुर आपल्या मदिरा नावाच्या पत्नीसह सुखपूर्वक जीवन व्यतीत करू लागला.

वर्णाश्रम-धर्म, सत्कर्म, यज्ञ, तप इत्यादी सर्व नष्ट झाले. दुःखी देवता ऋषींना बरोबर घेऊन सूर्याकडे गेल्या आणि त्यांनी या भयानक विपत्तीतून मुक्त होण्याचा उपाय सूर्याला विचारला. भगवान सूर्यांनी त्यांना एकाक्षर मंत्र देऊन भगवान गणेशांना प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली. देवगण आणि मुनिगण श्रद्धा-भक्तिपूर्वक भगवान महोदरांची उपासना करू लागले. त्यांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान महोदर प्रगट झाले. देवगणांनी आणि मुनींनी अत्यंत आर्त स्वराने महोदरांची स्तुती केली. भगवान महोदर म्हणाले की, मी मोहासुराचा वध करीन. आपण सर्वजण निश्चिंत व्हा.

असे म्हणून मूषकावर स्वार झालेले भगवान महोदर मोहासुराबरोबर युद्ध करण्यासाठी निघून गेले. हा समाचार देवर्षी नारदांनी मोहासुराला कळविला. तसेच त्याला अनंत पराक्रमी समर्थ महोदराचे स्वरूपसुद्धा समजावून सांगितले. दैत्यगुरू शुक्राचार्य यांनीही त्याला भगवान महोदरांना शरण जाण्याविषयी शुभ संदेश कळविला. त्याचवेळी भगवान विष्णू भगवान महोदराचे दूत होऊन मोहासुराकडे आले. त्यांनी मोहासुराला म्हटले- ‘तू अनन्तशक्ति-संपन्न भगवान महोदरांशी मित्रता करावयास हवी. यातच तुझे कल्याण आहे. जर तू महोदरांना शरण जाऊन देवगण, मुनिगण तसेच ब्राह्मणांना धर्मपूर्वक जीवन जगण्यात बाधा आणणार नाही,  असे वचन देशील तर कृपासागर प्रभू तुला क्षमा करतील. जर तू असे करणार नसशील तर रणभूमीत तुझे रक्षण होणे असंभव आहे.’

मोहासुराचा अहंकार नष्ट झाला. त्याने भगवान विष्णूंना विनंती केली की, आपण परम प्रभू भगवान महोदरांना माझ्या नगरीत आणून मला त्यांच्या दुर्लभ दर्शनाचा अवसर प्रदान करावा.

भगवान महोदरांनी मोहासुराच्या नगरीत पदार्पण केले. मोहासुराने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. दैत्य युवतींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मोहासुराने भगवान महोदरांची श्रद्धा-भक्तिपूर्वक पूजा केली. त्याने सद्गदित कंठाने स्तुती करीत भगवान महोदरांना म्हटले की,  प्रभो! अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला आहे, तो क्षमा करा. मी आपला प्रत्येक आदेश पालन करीन असे वचन देतो. आता मी देवगण आणि मुनिगण यांच्याकडे चुकूनदेखील जाणार नाही. त्यांच्या कोणत्याही धर्माचरणात विघ्न निर्माण करणार नाही.

अहेतुक कृपा करणारे भगवान महोदर मोहासुराच्या दैन्यभावावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आपली भक्ती प्रदान केली. मोहासुर शांत झाल्यामुळे देवता, ऋषी, ब्राह्मण तसेच धर्मपरायण स्त्री-पुरुष सर्वच जण सुखी झाले. देवता आणि मुनी महाप्रभू महोदरांची स्तुती आणि जयजयकार करू लागले.

गजानन

 

Gajanan गजाननः स विज्ञेयः सांख्येभ्यः सिद्धिदायकः ।
लोभासुरप्रहर्ता वै आखुगश्च प्रकीर्तितः ॥

भगवान श्रीगणेशाचा गजानन नावाचा अवतार सांख्यब्रह्माचा धारक आहे. सांख्ययोग्यांसाठी तो अवतार सिद्धिदायक समजावा. त्याला लोभासुराचा संहारक तसेच उंदीर वाहनावर आरूढ होणारा म्हटले गेले आहे.

एकवेळेचा प्रसंग आहे. देवगणांचे कोषाध्यक्ष कुबेर कैलासाला गेले. तेथे त्यांनी भगवान शिव-पार्वती यांचे दर्शन घेतले. कुबेर भगवती उमेच्या अनुपम सौंदर्याला मुग्ध दृष्टीने एकटक पाहू लागले. भगवती पार्वती कुबेर आपल्याकडे एकटक पाहात असलेले पाहून भयंकर क्रोधित झाली. भगवती पार्वतीच्या क्रोधित चर्येकडे पाहून कुबेर अत्यंत भयभीत झाले. त्याचवेळी भयभीत कुबेरांपासून लोभासुर उत्पन्न झाला. तो अत्यंत प्रतापवान आणि बलवान होता.

लोभासुर दैत्यगुरू शुक्राचार्याकडे गेला. त्याने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना शिष्य म्हणून स्वीकृत करण्याची विनंती केली. आचार्यांनी त्याला पंचाक्षरी ( ॐ नमः शिवाय) मंत्राची दीक्षा देऊन तपश्चर्या करण्यासाठी वनात पाठविले. निर्जन वनात जाऊन त्या बलवान असुराने प्रथम स्नान केले. नंतर भस्म धारण करून त्याने पंचाक्षरी मंत्राचा जप प्रारंभ केला. त्याने अन्न-पाण्याचा त्याग करून भगवान शंकरांच्या प्रसन्नतेसाठी घोर तपश्चर्या आरंभ केली. त्याने एक हजार दिव्य वर्षापर्यन्त अखंड तपश्चर्या केली. त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन,भगवान शिव प्रगट झाले.

लोभासुर देवाधिदेव भगवान शिवाच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांची स्तुती करू लागला. अमोघ वरदानी भगवान शंकरांनी त्याला वर देऊन त्रैलाक्यात निर्भय केले.

भगवान शिवांकडून अमोघ वर प्राप्त झाल्यामुळे निर्भय झालेल्या लोभासुराने दैत्यांची विशाल सेना एकत्र केली. त्या असुरांच्या सहयोगाने लोभासुराने प्रथम पृथ्वीवरील सर्व राजेलोकांना आपल्या अधीन केले. मग त्याने स्वर्गावर आक्रमण केले. इंद्राला पराजित करून त्याने अमरावतीवर आपला अधिकार जमवला. पराजित झाल्यामुळे इंद्र भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली. भगवान विष्णू असुरांचा संहार करण्यासाठी गरुडावर स्वार होऊन आले. दोघांमध्ये भयानक युद्ध झाले. भगवान शंकरांच्या वरामुळे अजेय लोभासुरापुढे त्यांनाही पराजय स्वीकारावा लागला.

विष्णू आणि अन्य देवतांचे रक्षक महादेव आहेत,  असा विचार करून लोभासुराने आपला दूत भगवान शिवांकडे पाठवला. दूताने शिवांना म्हटले-‘आपण परम पराक्रमी लोभासुराबरोबर युद्धासाठी सज्ज व्हावे अथवा पराजय स्वीकार करून कैलासाचा त्याग करावा.’  भगवान शंकरांनी आपण दिलेल्या वरदानाचे स्मरण करून कैलासाचा त्याग केला. लोभासुराच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्याच्या राज्यात संपूर्ण धर्म-कर्म समाप्त झाले. पापकर्माना ऊत आला. ब्राह्मण आणि ऋषि-मुनी दुःख सहन करू लागले.

रैभ्य मुनींच्या सांगण्यावरून देवतांनी गणेश उपासना केली. गजाननाने प्रसन्न होऊन देवतांना लोभासुराच्या अत्याचारापासून मुक्त करण्याचे वचन दिले. गजाननाने भगवान शिवांना लोभासुराकडे पाठविले. त्यावेळी शिवांनी गजाननाचा स्पष्ट शब्दात दिलेला संदेश लोभासुराला कळवला. ‘तू गजाननाला शरण जाऊन शांतिपूर्वक आपले जीवन व्यतीत कर, नाहीतर युद्धासाठी तयार हो.” त्याला गुरू शुक्राचार्यांनीही भगवान गजाननांचा महिमा सांगून भगवान गजाननांना शरण जाणे कल्याणकारक आहे असे सांगितले. लोभासुराने गणेश तत्त्वाला समजून घेतले. मग तर तो महाप्रभूंच्या चरणांना वंदन करू लागला. शरणागतवत्सल गजाननाने त्याला क्षमा करून पाताळात पाठवून दिले. देवता आणि मुनी सुखी होऊन गजाननाचे गुणगान करू लागले.

लम्बोदर

 

Lambodar लम्बोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हणः
शक्तिब्रह्माखुगः सद् यत् तस्य धारक उच्यते ॥

भगवान श्रीगणेशाचा ‘लम्बोदर’ नावाचा अवतार सत्स्वरूप तसेच शक्तिब्रह्माचा धारक आहे. याचेही वाहन उंदीरच आहे.

भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शिव काममोहित झाले. जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूपाचा त्याग केला, तेव्हा भगवान शिव दुःखी झाले आणि त्यांचा वीर्यपात झाला. त्यापासून एक महान प्रतापी काळ्या रंगाचा असुर उत्पन्न झाला. त्याचे डोळे तांब्याच्या धातूसारखे चमकदार होते.

तो असुर शुक्राचार्यांकडे गेला आणि म्हणाला- ‘प्रभो! माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि नामकरण करून माझे पालन-पोषण करा.’  शुक्राचार्य काही काळ ध्यानमग्न झाले. त्यानंतर त्यांनी योग्य विचार करून आपल्या या शिष्याचे नाव क्रोधासुर ठेवले. त्यांनी त्याचा संस्कार करून, शिक्षण देऊन त्याला योग्य बनवले. मग त्यांनी शंबर दैत्याची परम रूपवती कन्या प्रीती हिच्याशी त्याचा विवाह करविला. एके दिवशी क्रोधासुराने शुक्राचार्यांना हात जोडून म्हटले – ‘मी आपल्या आज्ञेने संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करू इच्छितो. म्हणून आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करा.’ शुक्राचार्यांनी त्याला विधिपूर्वक सूर्यमंत्राची दीक्षा दिली.

क्रोधासुर शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन वनात निघून गेला. तेथे त्याने एका पायावर उभे राहून सूर्यमंत्राचा जप केला. त्या धैर्यवान दैत्याने ऊन, वारा, थंडी आणि पाऊस यांचे कष्ट सहन करून, निराहार राहून कठोर तपश्चर्या केली. असुराची एक सहस्त्र वर्षे तपश्चर्या झाल्यावर भगवान सूर्य प्रसन्न होऊन प्रगट झाले. क्रोधासुराने त्यांचे भक्तिपूर्वक पूजन केले. भगवान सूर्यांना प्रसन्न असलेले पाहून तो म्हणाला- ‘प्रभो! माझा मृत्यू होऊ नये. मी संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करावा. सर्व योद्ध्यांत मी अद्वितीय योद्धा सिद्ध व्हावे.’  ‘तथास्तु!’  असे म्हणून भगवान सूर्य अंतर्धान पावले.

 

घरी परतल्यावर क्रोधासुराने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केले. शुक्राचार्यांनी त्याला आवेशपुरीत दैत्यांच्या राजपदावर अभिषिक्त केले. काही काळ लोटल्यावर त्याने असुरांजवळ ब्रह्मांडविजयाची इच्छा व्यक्त केली. असुर फार प्रसन्न झाले. विजय यात्रा प्रारंभ झाली. त्याने थोड्याच अवधीत पृथ्वीवर अधिकार प्राप्त केला. मग त्याने अमरावतीवर आपला मोर्चा वळविला. त्याच्या भीतीने सर्व देवगण पळाले. स्वर्गदेखील त्याच्या अधीन झाला. अशाप्रकारे वैकुंठ आणि कैलासावरही त्या महादैत्याचे राज्य स्थापित झाले. क्रोधासुराने भगवान सूर्याच्या सूर्यलोकालाही आपल्या अधीन केले. वरदान दिल्यामुळे सूर्यानेही दुःखी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला.

अत्यंत दुःखी झालेल्या देवता आणि ऋषींनी गणेशाची आराधना केली. या आराधनेमुळे संतुष्ट होऊन भगवान लम्बोदर प्रगट झाले. ते म्हणाले – ‘देवगणांनो आणि ऋषींनो! मी क्रोधासुराच्या अहंकाराला चूर करून टाकीन. तुम्ही लोक निश्चिंत व्हा. ‘

लम्बोदराबरोबर क्रोधासुराचा भीषण संग्राम झाला. देवगणसुद्धा असुरांचा संहार करू लागले. क्रोधासुराचे मोठमोठे योद्धे रणभूमीमध्ये मृत्युमुखी पडले. क्रोधासुर दुःखी होऊन लम्बोदराच्या चरणांना शरण गेला. आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती करू लागला. अहेतुक कृपाळू लम्बोदराने त्याला अभयदान दिले. भगवान लम्बोदराचा आशीर्वाद प्राप्त करून आणि त्यांची भक्ती प्राप्त करून क्रोधासुर शांत चित्ताने जीवनयापन करण्यासाठी पाताळात निघून गेला. सर्व देवता अभय प्राप्त झाल्याने प्रसन्न होऊन भगवान लम्बोदराचे गुणगान करू लागले.

विकट

 

Vikat विकटो नाम विख्यातः कामासुरविदाहकः ।
मयूरवाहनश्चायं सौरब्रह्मधरः स्मृतः ॥

भगवान गणेशांचा ‘विकट’ नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. तो मयूरवाहन आणि सौर ब्रह्माचा धारक मानला गेला आहे. भगवान विष्णू जेव्हा जालन्धर राक्षसाच्या वधासाठी त्याची पत्नी वृन्दा हिचे तप भंग करण्याच्या हेतूने गेले होते तेव्हा त्यांच्या वीर्याने कामासुर उत्पन्न झाला, जो महान तेजस्वी होता. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून मग तो तपश्चर्येसाठी वनात गेला. तेथे त्याने पंचाक्षरी मंत्राचा जप करीत कठोर तपश्चर्या प्रारंभ केली. भगवान शिवांच्या प्रसन्नतेसाठी त्याने अन्न-पाण्याचा त्याग केला. जसे दिवस जाऊ लागले तसे त्याचे शरीर क्षीण होत गेले, परंतु तेजमात्र वाढत होते. एक हजार दिव्य वर्षे पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रसन्न झाले. आशुतोष शंकर यांनी त्याला वर माग म्हणून म्हटले. कामासुर भगवान शिवांच्या दर्शनाने कृतार्थ झाला. त्याने भगवान शंकरांच्या चरणांना वंदन करून वराची याचना केली की ‘हे प्रभो! आपण मला ब्रह्मांडाचे राज्य तसेच आपली भक्ती प्रदान करावी. मी बलवान, निर्भय व्हावे. तसेच मला मृत्यूवर जय मिळावा.’

भगवान शिव म्हणाले – ‘जरी तू अत्यंत दुर्लभ तसेच देवांना दुःख देणाऱ्या वराची याचना केली आहेस तरीही मी तुझी कामना पूर्ण करतो.’ कामासुर प्रसन्न होऊन आपल्या गुरू शुक्राचार्यांकडे आला आणि त्यांना आपल्या शिवदर्शनाचा तसेच वर प्राप्तीचा संपूर्ण समाचार त्याने सांगितला. शुक्राचार्याने संतुष्ट होऊन महिषासुराची रूपवती कन्या तृष्णा हिच्याशी याचा विवाह करविला. त्याच काळात संपूर्ण दैत्यांच्या समक्ष शुक्राचार्यांनी कामासुराला दैत्यांचा अधिपती बनविले. सर्व दैत्यांनी त्याच्या अधीन राहाणे स्वीकार केले.

कामासुराने अत्यंत सुंदर अशा रतिद नामक नगराला आपली राजधानी जाहीर केले. त्याने रावण, शंबर, महिष, बळी तसेच दुर्मद या दैत्यांना आपल्या सैन्याचे मुख्य अधिकारी नियुक्त केले. त्या महान असुराने पृथ्वीवरील सर्व राज्यांवर आक्रमण करून ती सर्व राज्ये पादाक्रांत केली. नंतर त्याने आपला मोर्चा स्वर्गांकडे वळवला. इंद्रादी देव त्याच्या पराक्रमापुढे टिकाव धरू शकले नाहीत. सर्वजण त्याच्या अधीन झाले. वराच्या प्रभावामुळे कामासुराने थोड्याच अवधीत त्रैलोक्यावर अधिकार प्राप्त केला. त्याच्या राज्यात संपूर्ण धर्म-कर्म नष्ट झाले. चहूकडे लबाडी, कपट यांचेच साम्राज्य स्थापित झाले. देवता, मुनी आणि धर्मपरायण लोक हे अतिशय दुःखी झाले.

महर्षी मुद्गल यांच्या प्रेरणेने संपूर्ण देवगण आणि मुनिगण मयूरेश क्षेत्रात गेले. तेथे त्यांनी श्रद्धा-भक्तिपूर्वक गणेशाची पूजा केली. देवगणांच्या उपासनेने प्रसन्न होऊन मयूरवाहन भगवान गणेश प्रगट झाले. त्यांनी देवतांना ‘वर मागा’ म्हटले. देवगण म्हणाले-‘हे प्रभो! आम्ही सर्वजण कामासुराच्या अत्याचाराने अत्यंत दुःख भोगत आहोत. आपण आमचे रक्षण करावे.’ तथास्तु! असे म्हणून भगवान विकट तेथेच अंतर्धान पावले.

मयूर वाहन असलेल्या भगवान विकटांनी देवतांना बरोबर घेऊन कामासुराच्या नगराला चहूकडून वेढा दिला. कामासुरही दैत्यांसह युद्धासाठी आला. त्यावेळी घनघोर युद्ध होऊ लागले. त्या भीषण युद्धात कामासुराचे दोन पुत्र शोषण आणि दुष्पूर मारले गेले. भगवान विकट कामासुराला म्हणाले – ‘तू शिव-वराच्या प्रभावामुळे फार अधर्म केला आहेस. जर तुला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर तू देवतांशी द्रोह करणे सोडून दे आणि मला शरण ये. नाहीतर तुझा मृत्यू अटळ आहे.’ कामासुराने क्रोधात येऊन स्वतःची गदा भगवान विकटावर फेकली. ती गदा भगवान विकटाचा स्पर्श न करताच जमीनीवर आदळली. कामासुर मूर्च्छित झाला. त्याच्या शरीरातली सर्व शक्ती संपुष्टात आली. त्याने विचार केला- ‘या अद्भुत देवतेने जर शस्त्राविना माझी अशी दुर्दशा केली आहे, तर शस्त्र वापरल्यावर माझी काय स्थिती होईल ?’ शेवटी तो भगवान विकटाला शरण आला. मयूर-वाहन असणाऱ्या भगवान विकटाने त्याला क्षमा केली. देवता, मुनी भयमुक्त झाले. चहूकडे भगवान विकटाचा जयजयकार होऊ लागला.

विघ्नराज

 

Vignaraj विघ्नराजावतारश्च शेषवाहन उच्यते ।
ममतासुरहन्ता स विष्णुब्रह्मेति वाचकः॥

भगवान श्रीगणेशाचा ‘विघ्नराज’ नावाचा अवतार विष्णू ब्रह्माचा वाचक आहे. तो शेषवाहनावर आरूढ होणारा तसेच ममतासुराचा संहारक आहे.

एकवेळेचा प्रसंग आहे. भगवती पार्वती तिच्या सख्यांबरोबर बोलत असताना हसली. तिच्या हास्यातून एका पुरुषाचा जन्म झाला. तो पाहता पाहता पर्वताकार झाला. पार्वतीने त्याचे नाव ममतासुर ठेवले. तिने त्याला गणेशाचे स्मरण करण्यास सांगितले. त्याच्या स्मरणाने तुला सर्व काही प्राप्त होईल. पार्वतीमातेने त्याला गणेशाचा षडक्षर मंत्र (वक्रतुण्डाय हुम्) प्रदान केला. ममतासुर पार्वतीमातेच्या चरणांना वंदन करून वनाकडे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला.

तेथे त्याची शम्बरासुराशी भेट झाली. त्याने ममतासुराला संपूर्ण आसुरी विद्या शिकवल्या. त्या विद्यांच्या अभ्यासामुळे त्याला सर्व आसुरी शक्ती प्राप्त झाल्या. त्यानंतर शम्बरासुराने त्याला विघ्नराज यांच्या उपासनेची प्रेरणा दिली. ममतासुर तेथेच थांबून कठोर तपश्चर्या करू लागला. तो केवळ वायूचा आहार घेऊन विघ्नराज यांचे ध्यान व जप करत होता. अशाप्रकारे तपश्चर्या करीत असता एक सहस्र दिव्य वर्षे काळ लोटला. गणनाथ प्रसन्न होऊन प्रगट झाले. ममतासुराने विघ्नराज यांच्या चरणांना प्रणाम करून त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली. त्यानंतर तो म्हणाला – ‘हे प्रभो! जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर मला ब्रह्मांडाचे राज्य प्रदान करा. युद्धामध्ये मला कोणतेही विघ्न उपस्थित होऊ नये. भगवान शिव इत्यादींनाही मी सदैव युद्धात अजेय राहावा. भगवान विघ्नराज म्हणाले – ‘दैत्यराज ! तू माझ्याकडून दुःसाध्य वराची याचना केली आहेस, तरीही मी त्याची पूर्तता करीन.’

वर प्राप्त झाल्यावर तो प्रथम शम्बराकडे गेला. वर प्राप्तीचा समाचार कळल्याने शम्बर परम प्रसन्न झाला. त्याने आपली रूपवती कन्या मोहिनी हिचा विवाह ममतासुराशी करविला. हा समाचार जेव्हा शुक्राचार्यांना मिळाला, तेव्हा त्यांनी आनंदोत्सव करून ममतासुराला दैत्यांचा राजा केले.

 

एके दिवशी ममतासुराने शुक्राचार्याजवळ स्वतःच्या विश्वविजयाची इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्य म्हणाले – ‘हे राजन! तू दिग्विजय तर अवश्य कर, परंतु विघ्नेश्वराचा विरोध कधीही करू नको. विघ्नराज यांच्या कृपेनेच तुला ही शक्ती आणि वैभव प्राप्त झाले आहे.’

त्यानंतर ममतासुराने आपल्या पराक्रमी सैनिकांद्वारा पृथ्वी आणि पाताळ यांना आपल्या अधिकाराखाली घेतले. मग त्याने स्वर्गावर चढाई केली. इंद्राबरोबर त्याचे भीषण युद्ध झाले. रक्ताची नदी वाहू लागली. परंतु बलवान असुरांपुढे देवगण टिकू शकले नाहीत. स्वर्ग ममतासुराच्या छत्राखाली आला. युद्धात त्याने भगवान विष्णू आणि शिव यांनाही पराजित केले. संपूर्ण ब्रह्मांडावर ममतासुर शासन करू लागला. देवतांना त्याने कारागृहात बंद केले. धर्माचरणाचे नावदेखील कोणी घेणारा राहिला नाही.

सर्व देवगणांनी दुःख निवारण होण्यासाठी विघ्नराज यांची पूजा केली. एक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान विघ्नराज प्रगट झाले. देवतांनी त्यांना धर्माचा उद्धार करण्याविषयी तसेच ममतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्याविषयी प्रार्थना केली. भगवान विघ्नराज यांनी नारदांना ममतासुराकडे पाठविले. नारदाने ममतासुराला सांगितले की, त्याने अधर्म आणि अत्याचाराला संपुष्टात आणून विघ्नराज यांना शरण जावे. असे जर तो करणार नाही तर त्याचा सर्वनाश निश्चित होईल. शुक्राचार्यानेही ममतासुराला समजावून सांगितले. परंतु त्या अहंकारी असुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ममतासुराच्या दुष्ट आचरणामुळे विघ्नराज यांना क्रोध आला. त्यांनी आपल्या हातातील कमळ असुर सेनेत सोडले. त्याच्या गंधाने सर्व असुर मूर्च्छित तसेच शक्तिहीन झाले. ममतासुराने भीतीने थरथर कापत विघ्नराज यांच्या चरणावर लोळण घेतली. त्याने विघ्नराज यांची स्तुती केली आणि क्षमा मागितली. विघ्नराज यांनी त्याला क्षमा केली आणि त्याला पाताळात पाठवून दिले. देवगण मुक्त झाल्याने प्रसन्न झाले. चहूकडे भगवान विघ्नराज यांचा जयजयकार होऊ लागला.

धूम्रवर्ण

 

Dhumravarna धूम्रवर्णावतारश्चाभिमानासुरनाशकः
आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते ॥

भगवान श्रीगणेशाचा ‘धूम्रवर्ण’ नावाचा अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्यालाही मूषक वाहनच सांगितले गेले आहे.

एकेवेळी लोक-पितामह ब्रह्मदेवाने सूर्याला कर्माध्यक्षपद दिले. राज्यपद प्राप्त झाल्यामुळे सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. त्यावेळी त्यांना शिंक आली. त्यापासून अहंतासुराचा जन्म झाला. तो दैत्यगुरू शुक्राचार्याकडून गणेशमंत्राची दीक्षा प्राप्त करून तपश्चर्येसाठी वनात गेला. वनात अहंतासुर उपवासपूर्वक भगवान गणेशाचे ध्यान तसेच जप करू लागला. हजारो वर्षांची कठीण तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान गणेश प्रगट झाले. त्यांनी अहंतासुराला म्हटले ‘मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. पाहिजे तो वर माग.’ अहंतासुराने त्यांच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य, अमरत्व, आरोग्य तसेच अजेय होण्याचा वर मागितला. भगवान गणेश यांनी तथास्तु! असे म्हणून ते अंतर्धान पावले.

अहंतासुर तेथून परत गेला आणि त्याने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केले. आपल्या शिष्याला इच्छित फल प्राप्त झाल्याचा समाचार कळल्याने शुक्राचार्य परम प्रसन्न झाले. त्यांनी संपूर्ण असुरांना बोलावून त्यांना दैत्यांचा स्वामी बनविले. त्यावेळी दैत्यांनी फार मोठा आनंदोत्सव साजरा केला. विषयप्रिय नावाच्या नगरीत अहंतासुर सुखाने जीवनयापन करू लागला. त्याला सर्वाधिक योग्य समजून प्रमदासुराने आपली सुंदर कन्या हिच्याशी त्याचा विवाह करविला. काही समय लोटल्यानंतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे दोन पुत्र झाले.

एके दिवशी अहंतासुराने आपल्या सासऱ्याच्या सल्ल्याने आणि गुरूचा आशीर्वाद प्राप्त करून विश्वविजयासाठी प्रस्थान केले. असुराद्वारा भयानक नरसंहार होऊ लागला. चहूकडे हाणामारा याचा गोंधळ माजला. अशाप्रकारे सप्तद्वीप पृथ्वी अहंतासुराच्या अधिकाराखाली आली. परम प्रमादी अहंतासूराला भिऊन शेषानेसुद्धा त्याला कारभार देणे स्वीकार केले. नंतर अहंतासुराने स्वर्गावर आक्रमण केले. देवताकडून भगवान विष्णू युद्ध करण्यासाठी आले, परंतु तेसुद्धा पराजित झाले. सर्वत्र अहंतासुराचे शासन कायम झाले. देवता, ऋषि मुनी पर्वतात लपून राहू लागले. धर्म-कर्म नष्ट झाले. अहंतासुर देवता, मनुष्य आणि नाग यांच्या कन्यांचे अपहरण करून त्यांचा शीलभंग करू लागला. सर्वत्र पाप आणि अन्यायाचा डंका वाजला.

चोहोकडून असाहाय्य झाल्याने देवतांनी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने भगवान गणेशाची उपासना आरंभ केली. सातशे वर्षांच्या कठीण उपासनेनंतर भगवान गणनाथ प्रसन्न झाले. त्यांनी देवगणांची प्रार्थना ऐकून त्यांचे दुःख नाहीसे करण्याचे त्यांना वचन दिले.

प्रथम धूम्रवर्णाने देवर्षि नारदांना दूताच्या रूपात अहंतासुराकडे पाठविले. त्यांनी त्याला धूम्रवर्ण गणेशाला शरण जाऊन शांतिपूर्वक जीवनयापन करण्याचा संदेश कळवला. अहंतासुर क्रोधित झाला. संदेश निष्फल झाल्यामुळे नारद निराश होऊन परतले. भगवान धूम्रवर्णाने क्रोधित होऊन असुर सेनेवर आपला उग्र पाश टाकला. त्या पाशामुळे असुरांच्या नरडीला फास बसू लागला आणि असुर यमलोकाला जाऊ लागले. चहूकडे हाहाकार माजला. असुरांनी भीषण युद्धाचा प्रयत्न केला, परंतु तेजस्वी पाशाच्या ज्वालेत ते सर्व जळून भस्म झाले. अहंतासुर निराश होऊन शुक्राचार्याकडे गेला. त्यांनी त्याला धूम्रवर्णाला शरण जाण्याची प्रेरणा केली. अहंतासुराने भगवान धूम्रवर्ण यांच्या चरणांवर लोळण घेऊन त्यांचेकडे क्षमेची याचना केली. त्यांची विविध उपचारांनी पूजा केली. संतुष्ट झालेल्या भगवान धूम्रवर्णाने दैत्याला अभयदान दिले. त्याला असा आदेश दिला की, जेथे माझी पूजा होत नाही, तेथे तू निवास कर. माझ्या भक्तांना कधीही कष्ट-दुःख देण्याचा प्रयत्न करू नको. अहंतासुर भगवान धूम्रवर्णांच्या चरणांना प्रणाम करून निघून गेला. देवगणांनी आश्चर्यचकित होऊन श्रद्धापूर्वक धूमवर्णाांची पूजा केली आणि ते मुक्त कंठाने त्यांचा जयजयकार करू लागले.


Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Background